बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम आणि परिणामकारक बनवण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आयोजित सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावरील जिल्हास्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेला मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य) डॉ. निपुण विनायक होते, तर उपसचिव विलासजी बेद्रे प्रमुख उपस्थित होते. डॉ. विनायक यांनी थेट प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आरोग्य सेवांतील त्रुटींवर बोट ठेवत अधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला सेवा सर्वसमावेशक आणि परिणामकारक हवी, अन्यथा जबाबदारी निश्चित होईल! त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे सभागृहात गांभीर्याचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या आरोग्य उपक्रमांची माहिती देत कामगिरीचा आढावा मांडला. याआधी डॉ. विनायक यांनी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय, शेलगाव आटोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि भरोसा उपकेंद्राला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. भरोसा येथे महिला सरपंच बालाबाई हटकर यांच्याशी संवाद साधत त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
रेसिडेन्सी क्लब, बुलढाणा येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत अकोला मंडळाचे उपसंचालक डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











