बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भारतीय संसदेचा अवमान केल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाण्यात काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला.
१२ मार्च रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसद परिसरात काँग्रेस नेत्यांनी ‘चहा-बिस्कीट पार्टी’ करत संसदेच्या पवित्रतेचा अवमान केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. लोकसभा अध्यक्षांनी मकर प्रवेशद्वाराजवळ आंदोलनास मनाई केली असतानाही काँग्रेस खासदारांनी तेथे बसून संसदीय नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे भाजपा जिल्हाध्यक्ष मा. आ. विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस देशातील गॅस टंचाईबाबत खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला ऊर्जा व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आंदोलनात दत्ता पाटील, मंदार बाहेकर, डॉ. राजेश्वर उबरहंडे, चंद्रकांत बर्दे, डॉ. मधुसूदन सावळे, योगेश राजपूत, अभिमन्यू करपे, वर्षाताई पाथरकर, अजित गुळवे, प्रतीक गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










