spot_img
spot_img

जळगाव जामोद तहसील कार्यालयात खदखद! वकील संघ vs तहसीलदार – दबावतंत्राचा स्फोटक आरोप

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) येथे महसुली कामकाजावरून वातावरण तापले असून तहसीलदार पवन पाटील यांच्या कार्यपद्धतीवर वकील संघाने थेट आक्षेप घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. वकील संघाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात तहसीलदारांवर गंभीर आरोप करत सुनावणी प्रक्रियेत पक्षकारांना पुरेसा वेळ न दिला जात असल्याचा ठपका ठेवला आहे.

वकील संघाच्या म्हणण्यानुसार, एका दिवसात तब्बल 40 ते 50 महसुली प्रकरणे सुनावणीस ठेवली जातात. त्यामुळे न्याय मिळण्याऐवजी घाईघाईत निर्णय दिले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. याशिवाय, काही वकिलांना सुनावणीदरम्यान अपमानास्पद वागणूक मिळाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान धोक्यात येत असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तहसीलदार पवन पाटील यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावत पलटवार केला आहे. महसुली प्रकरणांचा प्रचंड वाढता ताण लक्षात घेऊन आठवड्यातून तीन दिवस सुनावण्या घेतल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक सुनावणीत 20 ते 25 प्रकरणेच ठेवली जातात आणि पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.

मात्र, काही प्रकरणांमध्ये वकील पत्र सादर न करताही निर्णय देण्यासाठी आवाज चढवून दबावतंत्र वापरले जात असल्याचा गंभीर आरोप तहसीलदारांनी केला आहे. “मी नेहमीच वकिलांना सहकार्य केले असून माझ्या कामाचे ज्येष्ठ वकिलांनी कौतुकही केले आहे. पण काही लोक जाणीवपूर्वक मिठाचा खडा टाकून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा दावा त्यांनी केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!