spot_img
spot_img

💥IMPACT जिवंत आईला ‘मृत’ ठरवून १० लाखांचा घोटाळा! ‘हॅलो बुलढाणा’च्या बातमीचा इम्पॅक्ट – अखेर गुन्हा दाखल

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा)“मी जिवंत आहे… तरी कागदोपत्री मला मारण्यात आलं!”ही केवळ हाक नाही, तर जळगाव जामोद नगर परिषदेच्या भोंगळ, बेजबाबदार आणि संशयास्पद कारभारावरचा जोरदार चपराक आहे. जिवंत असताना वृद्ध कौशल्याबाई राजपूत यांचा मृत्यू दाखला काढून त्यांच्या खात्यातील तब्बल १० लाख रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार ‘हॅलो बुलढाणा’ने उघड केल्यानंतर अखेर पोलीस प्रशासनाला जाग आली असून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात संतापजनक बाब म्हणजे, कौशल्याबाईंचा मुलगा प्रेमसिंह राजपूत याने स्वतःच्या फायद्यासाठी खोटे व बनावट स्वयंघोषणापत्र सादर केले. कोणतीही शहानिशा, प्रत्यक्ष चौकशी किंवा पुरावे न मागता नगर परिषदेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने थेट मृत्यूची नोंद करून प्रमाणपत्र दिले! हाच बनावट दाखला वापरून आईच्या एफडीमधील रक्कम काढण्यात आली आणि वृद्ध आईला अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले.

‘हॅलो बुलढाणा’ने हा अन्याय समाजासमोर आणल्यानंतर नगर परिषदेचे अतिरिक्त कार्यभार असलेले अधिकारी सुनिल निकाळजे यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रेमसिंह राजपूत याच्याविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रांच्या आधारे नगर परिषदेची दिशाभूल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास उपनिरीक्षक नारायण सरकाटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मात्र प्रश्न कायम आहे- 
जिवंत व्यक्तीचा मृत्यू दाखला देणाऱ्या नगर परिषदेतील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी?
बँकेनेही कोणती पडताळणी केली नाही का?
आणि न्यायासाठी भटकणाऱ्या कौशल्याबाईंच्या आयुष्याची भरपाई कोण करणार? हा केवळ एका वृद्ध महिलेचा प्रश्न नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या काळ्या कारभाराचा पर्दाफाश आहे. ‘हॅलो बुलढाणा’ हा अन्याय शेवटपर्यंत उघड करणारच!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!