जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तालुक्यात अवैध रेती माफियांचा माज पुन्हा एकदा उघडकीस आला असून, शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या मंडळ अधिकाऱ्यालाच खुलेआम धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वडशिंगी सर्कलचे मंडळ अधिकारी रामभाऊ उकर्डा भारसाकळे (वय ५७) यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीनुसार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता गोळेगाव खुर्द फाट्याजवळ ही थरारक घटना घडली.
अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कारवाई करत असताना, समोरून येणाऱ्या पिवळ्या रंगाच्या विना नंबर अशोक लीलँड टिप्परला थांबवण्यात आले. तपासणीदरम्यान टिप्परमध्ये सुमारे २ ब्रास रेती (अंदाजे किंमत २५ हजार रुपये) आढळून आली. मात्र रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना सादर करण्यात आला नाही.
या कारवाईदरम्यान प्रशांत खोकले (रा. आसलगाव) नावाचा इसम घटनास्थळी दाखल झाला. “हे वाहन माझे आहे, परवाना नाही, पण ५० हजार रुपये घेतले तर वाहन सोडून द्या,” अशी उघडपणे लाच देण्याची ऑफर त्याने मंडळ अधिकाऱ्याला दिली. अधिकारी भारसाकळे यांनी ठाम नकार देत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे संतापलेल्या खोकलेने टिप्पर चालकाला इशारा देत रेती रस्त्यावर सांडत टिप्पर पळवून लावला.
इतकेच नव्हे तर “तू नोकरी कशी करतोस ते पाहतो” अशी जीवे मारण्याची धमकी देत प्रशांत खोकलेने अधिकाऱ्यांच्या गाडीला धडक देण्याच्या उद्देशाने वेगाने वाहन चालवले. तहसीलदार व पोलीस घटनास्थळी दाखल होताच पाठलाग सुरू झाला, मात्र खोकले आपली कार रस्त्याच्या कडेला टाकून फरार झाला.सरकारी अधिकाऱ्यालाच धमकावणाऱ्या या रेती माफियांवर कठोर कारवाई होणार का, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकला आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










