डोणगाव (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) बातमीची हेडिंग वाचून तुम्हाला कळलं!असेल परंतु खरंच डोणगावमध्ये भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः हैदोस माजला असून गावकरी संतापाच्या भावना व्यक्त करत आहेत. मटन मार्केट, आठवडी बाजार, मुख्य चौक आणि गल्लीबोळांमध्ये तब्बल 100 ते 200 च्या दरम्यान कुत्र्यांचा थवा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतक्या मोठ्या संख्येने कुत्रे अचानक कुठून आले, याचा कसला तरी संशय निर्माण होत असून ग्रामस्थ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
या कुत्र्यांच्या धुमश्चक्रीमुळे कधीही एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. लहान मुलांवर, शाळकरी विद्यार्थ्यांवर किंवा नागरिकांवर हल्ला होण्याची भीती सतत व्यक्त होत आहे. तरीदेखील प्रशासन बेफिकीर असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.
कोणतीही दुर्घटना घडण्याआधीच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, हीच डोणगावकरांची एकमुखी मागणी.










