चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) आज सकाळी अंदाजे ८ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या प्रचंड धडकेने लक्ष्मण रामदास सपकाळ (32, रा. गोद्री, ता. चिखली) यांचा जागीच मृत्यू झाला. प्रभू भानदास दैकर (30, रा. गोद्री) हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.
घटनास्थळी चुराडा झालेली दुचाकी पाहून नागरिकांच्या अंगावर शहारे आले. अपघातानंतर धडक देणारे वाहन पसार झाले असून पोलिसांना या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी नागरिकांचा मदतीचा धागा शोधावा लागत आहे. वाहतूक नियमांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला बेजबाबदार भंग आणि अज्ञात वाहनांची बेछूट दौड यामुळे रस्ते मृत्यूच्या खाईत ढकलले जात असल्याची तीव्र भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
मृतकाचे शव पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे घटनेनंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या अपघातामुळे परिसरात संतापाचे वातावरण असून अज्ञात वाहनचालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.










