चिखली (हॅलो बुलडाणा) चिखली तालुक्यातील शिरपूर गावावर शोककळा पसरली आहे. राजस्थान येथे बैल खरेदीसाठी गेलेल्या तिघांवर परतीच्या प्रवासात भीषण अपघाताचा कहर ओढवला. या अपघातात भारत प्रकाश शेळके (वय 35) यांचा जागीच मृत्यू झाला असून, राजेंद्र बाहेकर व आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेजण राजस्थानला बैल आणून परत येत असताना महामार्गावर त्यांनी वाहन थांबवून लघवी करण्याकरिता रस्त्याच्या कडेला उतरले. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने जबर धडक दिल्याने तिघेही रस्त्यावर फेकले गेले. स्थानिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले, मात्र भारत शेळके यांना वाचवणे शक्य झाले नाही.
या दुर्दैवी घटनेने शिरपूर गावात हळहळ व्यक्त केली जात असून, मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजस्थान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, अपघातग्रस्त वाहन चालक फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू आहे.










