मेहकर (हॅलो बुलडाणा) उत्कंठा, थरार आणि संघर्ष यांच्या वादळातून आपला मार्ग काढत, केवळ 10 महिन्यांच्या ऐच्छिक सेवानिवृत्तीनंतर मंत्रालयातील कक्ष अधिकारी आमदारपदाच्या शिखरावर झेपावलेले नाव म्हणजे आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात. मंत्रालयातील आरामदायी खुर्ची सोडून मातीसाठी, मातीतील माणसांसाठी झटणाऱ्या या ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात इतिहास रचला.
बालपणी आईकडून बाबासाहेबांवरील गाणी ऐकत वाढलेल्या खरात साहेबांच्या मनात सामाजिक परिवर्तनाची बीजे रोवली गेली. शिक्षणासाठी ताडशिवणी ते किनगावराजा पायपीट, स्पर्धा परीक्षेत यश, पीएसआयचे प्रशिक्षण, मंत्रालयात नितीन राऊत व डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे खाजगी सचिव, दिल्लीतील केंद्र सरकारचा अनुभव ही सर्व शिदोरी त्यांच्या सेवाभावी प्रवासाची पायाभरणी ठरली. मात्र, ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी कक्ष अधिकाऱ्यांच्या मर्यादा जाणवताच त्यांनी मंत्रालयीन कारकीर्द संपवून थेट लोकप्रतिनिधी होण्याचा निर्णय घेतला.उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून शेतीपूरक उपक्रम, दुग्धव्यवसाय चळवळ, वामनदादा कर्डक पुरस्कार, संत साहित्य संमेलन, महिला व युवकांना प्रेरणादायी कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. 2024 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मित्रपक्षांचे उमेदवार म्हणून विजय मिळवत त्यांनी राजकीय जाणकारांनाही आश्चर्यचकित केले.
आज, एक अभ्यासू, संघर्षशील आणि दूरदृष्टी असलेले आमदार म्हणून सिद्धार्थ खरात जनतेच्या मनात ठसा उमटवित आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकरवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.