बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जळगाव जामोद येथील आम. संजय कुटे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणारे भाजप कार्यकर्ते स्व.पंकज देशमुख यांची आत्महत्या की घातपात हे प्रकरण राज्यभर गाजत आहे. न्यायासाठी त्यांच्या पत्नी शासन दरबारी उंबरठा झिजवत आहेत. त्यांना जळगाव जामोद संग्रामपूरच्या न्याय हक्क जन आंदोलन समितीने पाठिंबा दर्शवित संघर्ष जारी ठेवला असून, ही समीती अश्लील पोस्ट व्हायरल करत असून काही कुटुंबांना पुरावे नसताना जीवघेण्या धमक्या देत असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना करण्यात आली आहे.तक्रारीत एका वृत्तवाहिनीचा प्रामुख्याने उल्लेख असून, योग्य चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गीता सरोदे, शिल्पा ठाकरे, सुमिती शर्मा, भावना देशमुख, नंदा देशमुख, तीरोत्तमा शेळके, नाहीद परविन अब्दुल जलील, द्वारकाबाई धर्मे,परविन जहाँ जकीउल्लॉ खान, पुनम लपटने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जामोद येथील स्व.पंकज देशमुख यांनी शेतात बायपास घेऊन आत्महत्या केली होती.परंतु त्यांच्या कुटुंबीयांना पतीची आत्महत्या नसून हत्या केली आहे अशी भावना निर्माण झाल्यामुळे त्यांनी सीआयडी चौकशीची मागणी शासनाकडे केली आहे.याप्रकरणी सोशल मीडिया व वृत्तपत्र माध्यमातून सदर प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचे कळत आहे.२२ जुलै रोजी एका वृत्तवाहिनीच्या बातमीतून या प्रकरणी कोणताही पुरावा नसताना स्वर्गीय पंकज देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आमच्या पतींचे नाव घेतली,त्यामुळे कुटुंबीयांची प्रचंड बदनामी होत असून होणाऱ्या मानसिक त्रासापायी आम्ही ताण-तणावात आहोत.सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या पतींना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत व अश्लील भाषेत टीकाटीपणी केलेली आहे.याप्रकरणी जळगाव जामोद येथील विविध राजकीय पक्षाचे नेते- कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन न्याय हक्क जन आंदोलन समिती स्थापन केली आहे.सदर समितीस्थापन झाल्यापासून आणि वर्तन पाहता ही समिती राजकीय हेतूने प्रेरित असून तक्रारदार श्रीमती देशमुख यांच्या सतत संपर्कात राहून त्यांची दिशाभूल करीत आहे,असे आमचे ठाम मत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या समितीतील काही सदस्यांनी व त्यांच्या समर्थकांनी आमच्या पतींना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिली आहे.षडयंत्ररचून या प्रकरणी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असून, संबंधित समिती सदस्यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी,आमच्या पतींवर अतिरिक्त गुन्हेदाखल करण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.