डोणगाव (हॅलो बुलडाणा) येथील महाराष्ट्र अर्बन को-अप क्रेडिट सोसायटीत शेतकऱ्यांची फसवणूक करून सोसायटी अध्यक्षाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या पैशातून सोसायटी अध्यक्ष्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले. कॅलेंडर, जाहिराती खर्च सुद्धा शेतकऱ्यांच्या पैशातून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे डोणगाव येथील महाराष्ट्र अर्बन को ऑप सोसायटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील इतर शाखांची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. असा इशारा डोणगाव येथील अमोल सुभाष पळसकर यांनी बुलढाणा जिल्हा उपनिबंधक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे. की, डोणगाव येथील महाराष्ट्र अर्बन को अप क्रेडिट सोसायटीत ३० लाख रुपये कर्ज मंजूर होवुन सदर कर्जाच्या सुरक्षीततेसाठी ३० लाख रुपयांच्या शेतीचे गहाणखत लिहुन घेवून आजपर्यंत कर्ज दिले नसून मंजूर होवून सदर कर्जाचा ७/१२ उताऱ्यावर बोजा चढवून पूर्ण कर्जाची रक्कम न देता केवळ २० लाख रुपये देवून फसवणूक केली आहे. उर्वरित रक्कम १० ते १२ दिवसांमध्ये देवु असे सांगीतले. त्यानुसार जमिनीच्या व्यवहाराकरिता ५ लाख रुपये इसारा पोटी दिले होते. परंतु गैरअर्जदाराने मला आजपर्यंत उर्वरित रक्कम १० लाख रुपये न दिल्याने माझे १९ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच सोसायटीने आकारलेले व्याजदराबाबत सुध्दा माहिती मागीतली. परंतु, त्यांनी दिली नाही. तर दिलेल्या कर्जाचा तात्काळ भरणा करा अन्यथा मालमत्ता जप्त करू, अशी धमकी दिली. गैरअर्जदाराने वाढदिवसाच्या जाहिरातीचे पैस व कॅलेंडर चे पैसे सुद्धा अनधिकृतपणे माझ्यावर लादले आहेत. गैरअर्जदाराच्या ह्या महाराष्ट्र अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करत आहे व स्वतःच्या वाढदिवसाचे व कॅलेंडर द्वारे जाहिरात करण्याचे पैसे सुद्धा गैरअर्जदार शेतकऱ्यांकडून अनधिकृत कृत्य करून वसूल करत आहे. गैरअर्जदारामुळे माझे नुकसान झाले तसेच त्यांनी माझी फसवणुक केली. गैरअर्जदारामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गैरअर्जदाराचे पत संस्थेची मान्यता रद्द करून माझी नुकसान भरपाई द्यावी, तसेच डोणगाव येथील महाराष्ट्र अर्बन को अप क्रेडिट सोसायटीचे शाखाधिकारी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शाखेंची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी. तसेच परवाना रद्द करावा.गैरअर्जदारामुळे माझे दुहेरी नुकसान झाले व माझी फसवणूक झाली असून न्याय द्यावा, अशी मागणी अमोल सुभाष पळसकर यांनी जिल्हा उपनिबंधक यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री, सहकार आयुक्त पुणे, सहकार विभागीय आयुक्त अमरावती, शेतकरी नेते रविकांत तुपकर, आमदार सिद्धार्थ खरात, ठाणेदार यांना दिल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात कोट्यावधी रुपयांचे घबाड बाहेर येण्याची शक्यता?
महाराष्ट्र अर्बन को अप क्रेडिट सोसायटीत शेतकऱ्यांची फसवणूक करून सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस हा शेतकऱ्यांच्या पैशातून साजरा करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचा खर्च तसेच इतर खर्चाची रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर अनधिकृत लादण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या नावावर महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव सोसायटीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. हा प्रकार महाराष्ट्रातील संपूर्ण शाखेमध्ये झाला असून महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीची महाराष्ट्रातील संपूर्ण शाखेचे चौकशी करू करावी. महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी केल्यास कोट्यावधी रुपयांचे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ते चौकशी करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पळसकर यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे.