बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा शहरालगतचे माळविहीर(वृंदावन नगर) हे गाव आज खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या चिखलात गाडले गेले आहे! ग्रामसेवक बेपत्ता, पिण्याचे पाणी नाही, रस्त्यांऐवजी चिखलाचे डबके, आणि प्रशासन मात्र गाढ झोपेत – हीच मालविहीरची आजची तक्रार! गेल्या अनेक महिन्यांपासून गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. रस्ते खोदून ठेवले, मात्र दुरुस्तीसाठी कोणताही ठोस प्रयत्न नाही. परिणामी गावातील मुख्य वस्ती चिखलाने भरलेली असून लहान मुले शाळेत जायला घाबरतात, तर वृद्धांची अवस्था दयनीय झाली आहे. या सगळ्या परिस्थितीत ग्रामसेवक दोन दिवसांपासून गायब आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे संतप्त गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला आहे.
“ग्रामसेवक कुठे? कदाचित चिखलातच अडकले असतील!” अशी बोचरी प्रतिक्रिया देत गावकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. केवळ ग्रामसेवकाच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणा ढिम्म असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे