चिखली (हॅलो बुलडाणा/सय्यद साहिल) शहरातील स. द. म्हस्के रोडवरील विहिरीत 65 वर्षीय वृद्धेचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होती. मृत महिलेची ओळख दुर्गाबाई जुलालसिंग राजपूत (वय ६५, रा. रामानंद नगर, चिखली) अशी झाली आहे.
दुर्गाबाई राजपूत यांचा ४ एप्रिलपासून शोध सुरू होता. त्यांच्या नातेवाइकांनी चिखली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, दोन दिवसांच्या शोधानंतर आज (रविवार) दिनांक ६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास स. द. म्हस्के रोडवरील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला.मृतदेह विहिरीत सापडल्याची बातमी वार्यासारखी पसरताच नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. दुर्गाबाई यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दुर्गाबाई यांच्या मृत्यूमागे आत्महत्या, घातपात की अन्य कोणतीही शक्यता आहे का, याचा छडा लावण्याचे काम सुरू आहे.