खामगाव (हॅलो बुलडाणा) “काँग्रेसचा परिंदा” अशी ओळख मिरवणारे, निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी अखेर काँग्रेसचा झेंडा खाली ठेवत पक्षाच्या सर्व पदांवरून व सदस्यत्वावरून ३१ मे रोजी थेट राजीनामा दिला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांना त्यांनी हे पत्र पाठवले आहे.
सानंदा यांनी आपल्या राजीनामा पत्रात ४० वर्षांच्या कार्यकाळातील निष्ठा, संघर्ष आणि पक्षवाढीतील योगदान याचा उल्लेख करताना पक्षात चाललेल्या अन्यायकारक आणि अपमानास्पद वागणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मला डावलले गेले, तर माझ्याच विरोधात भाजपच्या उमेदवारास मदत करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही,” असा आरोप करत त्यांनी पक्षातील गटबाजी, दुटप्पी भूमिकांवर थेट बोट ठेवले आहे.विशेष म्हणजे, त्यांच्यावरच खामगावमधील २६ एप्रिलच्या सद्भावना सभेची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्याविरोधात काँग्रेस शहराध्यक्षा सरस्वतीताई खासने यांनी थेट तक्रार केली होती, पण नेतृत्व गप्प राहिले!
राजीनामा देऊन अवघ्या काही दिवसांत सानंदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ते ‘घड्याळ’ हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.