बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांना चांगलाच धडा शिकवला त्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात आज सकाळी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली.
रॅलीत भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या तसेच पाकिस्तानचा निषेध केला जात होता. नागरिकही रॅलीमध्ये तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. देश व सैन्याबद्दल असलेली भावना आणखी दृढ करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली भाजपा जनसंपर्क कार्यालया समोरून निघाली. जयस्तंभ चौक,संगम चौक, बाजार गल्ली, चिखली मार्गाने सर्कुलर मार्ग, शहीद जवान स्मारकापर्यंत नेण्यात आली.येथे शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. ‘भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूरद्वारे देशद्रोह्यांना व दहशतवाद्यांना धडा शिकविला. भारतीय सैनिकांना एकात्मतेचा, अभिमानाचा व प्रोत्साहानाचा संदेश देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.देशप्रेम जागविण्यासाठी व सैनिकांचं मनोबल वाढविण्यासाठी ही रॅली प्रेरणादायी ठरावी,अशी विजयराज शिंदे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.