बुलडाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेनेच्या उबाठा गटाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. बुलडाण्यातील भाजपच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली.
डॉ. सावळे यांचा बुलडाणा विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. अनेक वर्षे शिवसेनेत सक्रिय राहून त्यांनी तालुकाप्रमुख पदाची धुरा सांभाळली होती. दोन वेळा विधानसभा निवडणुकीत त्यांचे नाव चर्चेत होते, मात्र अंतिम टप्प्यात तिकीट न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी होती. शेवटी आज त्यांनी “जय महाराष्ट्र” करत भाजपचा झेंडा हाती घेतला.पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. सावळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात विकासाची नवी गंगा वाहत आहे. भाजपचे विकासोन्मुख धोरण आणि नेतृत्व मला भावले, म्हणून मी हा निर्णय घेतला.”