बुलढाणा (हॅलो बुलडाणा / जितेंद्र कायस्थ) भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आणि बुलढाणा (घाटावरील) जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार विजयराज शिंदे यांची निवड झाल्याची वार्ता बुलढाण्यात धडकली. ही वार्ता धडकताच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भारी जल्लोष आणि आनंद दिसून आला. विजयराज शिंदे यांच्यावर आगामी काळात बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी असणार आहे. खरेतर विजयराज शिंदे यांचे संघटन कौशल्य पाहता त्यांना हे करणे कठीण नाही. परंतु आज विजयराज शिंदे यांनी जी काही मजल मारली आहे, त्यामागे त्यांचा अत्यंत खडतर असा प्रवास राहिलेला आहे. अनेक उन्हाळे-पावसाळे आणि राजकीय चढ-उतारातून त्यांची राजकीय कारकिर्द तावून-सुलाखून निघालेली आहे.
१९९० च्या दशकात जेंव्हा शिवसेनेचा महाराष्ट्रात हळूहळू विस्तार होऊ लागला होता, तेंव्हा बुलढाणा जिल्ह्यातही शिवसेनेला जे नवे अंकुर फुटत होते, त्या अंकुरांपैकी एक विजयराज शिंदे होते. गुरव समाजातील एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विजयराज शिंदे यांचा जीवनप्रवास खरंच थक्क करणारा आहे. शिवसेनेत प्रवेश करताना विजयराज शिंदे यांची केवळ एक चहाची टपरी होती. त्यावर त्यांची आणि परिवाराची गुजराण चालायची. शिवसेनेत काम करताना त्यांनी अत्यंत आक्रमकपणे जनहिताची कामे केली, तसेच बुलढाणा-मोताळा तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला. कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी उभारली. त्यांचे हे कार्य पाहता अचानक १९९५ साली त्यांना आमदारकीचे तिकीट देण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला.
हा निर्णय खरेतर शिंदे यांच्यासाठी धक्कादायक होता. परंतु एका सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याची बाळासाहेब ठाकरे हे काळजी घ्यायचे, त्याचे हे द्योतक होते. निवडणुकीचे तिकीट तर मिळाले, परंतु पैसे कुठून आणणार, हा यक्षप्रश्न शिंदे यांच्यासमोर होता. परंतु कार्यकर्ते तन-मन-धनाने कामाला लागले आणि १९९५ अत्यंत युवा अवस्थेत विजयराज शिंदे पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत धडकले. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शिंदे यांनी कामाचा झपाटा लावला. बुलढाणा व मोताळा तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे त्यांनी मार्गी लावली. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्राधान्य दिले. पाच वर्षे त्यांच्या कामाने मतदारसंघात अनेक विकासकामे झाली.
पुढे १९९९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला. काँग्रेसचे ध्रुपदराव सावळे निवडून आले, परंतु पराभवाने खचून जाणे हे विजयराज शिंदे यांना अजिबात मान्य नव्हते. ते परत नव्या जोमाने कामाला लागले. शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत करीत त्यांनी २००४ साली पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली. पुन्हा तोच कामाचा धडाका कायम ठेवला. कालांतराने अनेक राजकीय शत्रू विजयराज शिंदे यांच्या जीवनात आले. त्यांनी अनेक कपटकारस्थाने त्यांच्याविरोधात केली. परंतु जनमानसात प्रतिमा असल्याकारणाने विजयराज शिंदे यांची महती कमी झाली नाही. मतदारसंघात त्यांच्या कामाची पदचिन्हे आजही स्पष्टपणे दिसून येतात. २००९ साली परत एकदा विजयराज शिंदे हे विधानसभेत दाखल झाले. त्यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवून टाकला. एकीकडे आमदारकीची जबाबदारी तर दुसरीकडे संघटन कार्याचा विस्तार ते करीत राहिले.
बघता-बघता पाच वर्षे निघून गेली आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढल्याने मतांच्या विभाजनाचा फटका शिंदेंना बसला व ते निवडणुकीत पराभूत झाले. इथून पुढे खऱ्या अर्थाने विजयराज शिंदे यांच्या जीवनातील खडतर राजकीय प्रवास सुरू झाला. विरोधकांची कपटकारस्थाने पाहता त्यांना पक्षात एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. परंतु सातत्याने निष्ठा कायम ठेवत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली जवळीक कायम राखली होती. शिवसेनेत त्यांना सातत्याने एकटे पाडण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांनी केला. परंतु तरीही विजयराज शिंदे यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. परंतु २०१९ च्या निवडणुकीत चक्क त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अखेर नाईलाज झालेल्या विजयराज शिंदे यांनी भारिप-बहुजन महासंघाकडून उमेदवारी प्राप्त केली आणि निवडणुकीत जोरदार टक्कर दिली, परंतु येथेही त्यांचा पराभव झाला.
हिंदुत्ववादी विचारसरणीची पकड असणारे विजयराज शिंदे हे भारिप-बहुजन महासंघात फार काळ रमले असते तरच नवल. अखेर त्यांच्या कार्याचे विशाल वर्तुळ हे भाजप नेत्यांच्या नजरेतूनही सुटले नाही. आमदारकी नाही परंतु मतदारसंघात कामे तर झालीच पाहिजेत, या उद्देशाने मग विजयराज शिंदे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला.
आपल्या नेहमीच्या कार्यशैलीमुळे विजयराज शिंदे यांनी भाजपमध्येही लवकरच आपले मजबूत स्थान निर्माण केले. त्यांनी भाजपचे संघटन वाढवण्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोलाचा हातभार लावला आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना अखेर भाजपच्या पक्षनेतृत्वाने आता जिल्हाध्यक्षांची माळ त्यांच्या गळ्यात घातली आहे. भाजपने जिल्हाध्यक्षपद देऊन खरेतर एका सामान्य कार्यकर्त्याचा गौरव केला आहे. त्यांच्या या जबाबदारीचा भाजपला घाटावरील तालुक्यांमध्ये संघटनवाढीसाठी नक्कीच होईल. त्यांचा दांडगा अनुभव, संघर्षशील प्रवृत्ती, जनमानसात काम करण्याची त्यांची हातोटी ही भाजपला आगामी काळात चांगले यश मिळवून देईल, याबाबत सध्यातरी काही शंका दिसून येत नाही. त्यांच्या निवडीमुळे सध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदारापर्यंत आणि पुढे भाजप जिल्हाध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा खडतर प्रवास हा कार्यकर्त्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतो.