बुलढाणा (हॅलो बुलडाणा) 10 मे सहकार विद्या मंदिरच्या सीबीएसई इमारतीचे आज दिमाखदार नामकरण करण्यात आले असून, आता ती “ऑपरेशन सिंदूर” या नावाने ओळखली जाईल. 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैंसरण घाटीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 निरपराध भारतीय पर्यटकांचे प्राण गेले. या क्रूर हल्ल्याचा भारतीय सैन्याने चोख बदला घेतला. तिन्ही सैन्य दलांनी एकत्रित कारवाई करत 7 मेच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. या धडाकेबाज कारवाईला “ऑपरेशन सिंदूर” असे नाव देण्यात आले.या शौर्याला मानवंदना देण्यासाठी बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमल झंवर यांच्याशी चर्चा करून सहकार विद्या मंदिरच्या सीबीएसई इमारतीला “सिंदूर” असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आज झालेल्या नामकरण सोहळ्यात भारतीय सैन्य दलाच्या वीरांना सलाम करण्यात आला.
“सिंदूर” हे नाव आता या शालेय इमारतीच्या भव्यतेला एक नवा आयाम देणार असून, भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देईल. बुलढाणा अर्बनच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, देशभक्तीची ज्योत अधिक तेजाने पेटविण्याचे कार्य या माध्यमातून घडले आहे.