बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय भूकंप घडतच आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला जोरदार धक्का देत जिल्हा प्रवक्ता सुजीत देशमुख, शहराध्यक्ष अनिल बावस्कर आणि शहर कार्याध्यक्ष सत्तार कुरेशी यांनी आपल्या पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या तिन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला.मुंबईत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगराध्यक्ष टी.डी. अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी दीपक गायकवाड, राजेश गवई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही शरद पवार गटाला रामराम ठोकत अजित पवार गटात सामील होत शक्तीप्रदर्शन केले.
निवडणुकीपूर्वीचा खळबळजनक प्रवेश!
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा प्रवेश झाल्याचे मानले जात आहे. बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे बळ मानले जाणारे हे पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याने शरद पवार गटाचे नेतृत्व अडचणीत आले आहे. आगामी निवडणुकीत याचा थेट फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.