खामगाव (हॅलो बुलडाणा) शहरातील चिंतामणी मंदिर परिसरातून पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या १७ वर्षीय तरुणी संजिवनी हिचे दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता संशयास्पदरीत्या अपहरण झाले आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अप. क्र. 130/2025 नुसार कलम 137(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुनिल रामकिसन चव्हाण (रा. मुळडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) या २४ वर्षीय तरुणावर अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. बटवारे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संजिवनी ही खामगावमधील जीएस कॉलेजच्या मैदानावर रोज सकाळी रनिंगसाठी जात होती. मात्र २८ तारखेला ती नेहमीप्रमाणे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. सहकारी मुलींना विचारणा केली असता, संजिवनीने रनिंगला हजेरी लावली नव्हती, हे उघड झाले. मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे सुनिल चव्हाण याच्याशी तिचा संपर्क होता, हे समोर आले आहे. तोच तिचा संपर्क क्रमांक बंद असून, अपहरणाचा गंभीर संशय आहे.पोलीस निरीक्षक आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.