चिखली (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे उभे ठाकतात.त्यापैकी एक शेतरस्त्यांचा प्रश्न गोचीडा सारखा रुतून बसला आहे.परंतु प्रशासकीय यंत्रणेत इच्छाशक्ती असली तर हा प्रश्न सुटू शकतो हे नायब तहसीलदार वीर यांनी चिखली तालुक्यातील 60 शेत रस्ते मोकळे करून दाखवून दिले आहे.या शेत रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अलीकडे राजकीय व शेतकरी नेत्यांचा हस्तक्षेप झाल्याने दोन शेतकरी गटातील वाद हा अधिकाऱ्यांच्या डोक्याला ताप बनतो. त्यामुळे
शेत रस्ते, पांधण रस्त्याचे अनेक प्रकरणे महसुल दप्तरी धूळ खात पडलेले असतात. चिखली महसूल विभागात निवासी नायब तहसीलदार श्रीहरी ज्ञानदेव वीर यांनी मात्र याप्रकरणी इच्छाशक्ती दाखवून दिली. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने शेत रस्ते मोकळे केल्याने दशकापासून त्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. नायब तहसीलदार विर यांनी चिखली तालुक्यांतील तब्बल 60 पांधन रस्त्यांना मोकळे केल्याने शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी सोयीस्कर झाले आहे. खुपगाव ते कोलारी हा दोन गावांतील शेतकऱ्यांना दळण वळण साठी महत्त्वाचा असलेला रस्ता अडविल्याच्या तक्रारीची दखल घेत शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांची समस्या जाणून एक कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले वीर यांनी आपल्या टीम सह पांधनरस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेतला.जिल्ह्यातील इतरही शेत रस्ते मोकळे करण्यासाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी असे प्रयत्न करावेत अशी भावना व्यक्त होत आहे.