बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभा निवडणुकीतील निकाल पराभूत उमेदवारांना पटला नव्हता त्यामुळे त्यांनी ईव्हीएम गैरव्यवहाराचा आरोप करीत विदर्भातील तीन आमदारांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी भाजपचे जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड व भाजपचे प्रताप अडसूळ यांना नोटीस बजावली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाच्या जयश्री शेळके आणि काँग्रेसच्या स्वातीताई वाकेकर यांनी या याचिका दाखल केल्या. निवडणूक आयोगाने ईव्हीएम संदर्भातील आवश्यक प्रक्रिया न पाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएम निवडणुकीसाठी आयोगाने नोटिफिकेशन काढले नाही, निकालानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म १७ पराभूत उमेदवारांना दिले जात नाहीत, तसेच व्हीव्हीपॅटची मोजणी होत नाही, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.सोमवारी न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. निवडणूक आयोग आणि अन्य पक्षकारांना वगळून फक्त विजयी उमेदवारांना नोटीस पाठवण्याचे आदेश देण्यात आले.दरम्यान तिघांना चार आठवड्यांत उत्तर सादर करावे लागेल. न्यायालयीन लढाईमुळे विदर्भातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.