जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) मतदारसंघात विकासाच्या दिशेने एक भव्य पाऊल उचलण्यात आले आहे. गेल्या वीस वर्षांतील आमूलाग्र बदलांची साक्ष देणारा ऐतिहासिक टप्पा आज गाठण्यात आला. आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांच्या हस्ते पोलीस प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून आमदार संजय कुटे उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, तसेच जळगाव जामोद पोलीस निरीक्षक श्रीकांत नीचळ यांची प्रमुख उपस्थिती मंचावर दिसून आली.
या प्रसंगी बोलताना आमदार कुटे यांनी जळगाव जामोद मतदारसंघ २०३४ पर्यंत महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी जाहीर केले की, पोलीस स्टेशनच्या नवीन दोन मजली इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सुमारे पावणेचार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याशिवाय, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुमारे दहा कोटींच्या निवास सुविधा उभारण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे, शतकपूर्ती करणाऱ्या जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतीच्या बदलत्या गरजा ओळखून ही सुविधा निर्माण केली जात आहे. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक विश्वजीत पानसरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले, तर सूत्रसंचालन अनिल भगत यांनी पार पाडले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला पत्रकार बंधू, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस पाटील यांनी मोठी उपस्थिती लावली.