बुलढाणा (हॅलो बुलडाणा) डिजिटल युगातील बदलत्या पत्रकारितेच्या गरजांना ओळखून मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हास्तरीय बैठक उद्या, 16 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा पत्रकार भवन, बुलढाणा येथे होणार आहे. डिजिटल माध्यमांच्या महत्त्वाची जाणीव ठेवून मराठी पत्रकार परिषदेच्या मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद स्थापन करण्यात आली आहे.
डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार असून, जिल्ह्यातील डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांचे संघटन बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड होईल. यावेळी घाटाखाली व घाटावर असे दोन विभाग तयार करून दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल.
बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील यूट्यूब चॅनेल्स, न्यूज पोर्टल्स व डिजिटल माध्यमांशी संबंधित संपादक व पत्रकारांना या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा प्रभारी अनिल उंबरकर यांनी केले आहे. बदलत्या माध्यमांमध्ये प्रिंटसोबतच डिजिटल मीडियाचाही दबदबा वाढत असताना ही बैठक जिल्ह्यात डिजिटल पत्रकारितेसाठी नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.