डोणगाव (हॅलो बुलडाणा / अनिल राठोड) नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात डोणगाव येथील युवकांनी मानवी संवेदनशीलतेचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला. मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एक गाय बेशुद्ध अवस्थेत पडल्याची घटना समोर आली. त्या वेळी, सर्वत्र नवीन वर्षाचे स्वागत जोरदार साजरे होत असताना, काही युवकांनी आपल्या दारू, डॉल्बी आणि पार्टीच्या आनंदाला दुय्यम मानत गाईला वाचवण्याचा निर्धार केला.
रेहेमतिया सोशल ग्रुपचे अध्यक्ष ज़ैनुल आबेद्दीन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री गाईची अवस्था पाहून गोप्रेमी नागेश परमाळे यांना संपर्क साधला. तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखत नागेश परमाळे यांनी जेसीबीच्या सहाय्याने गाईला डोणगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवले.
डॉ. आनंद आस्वार आणि त्यांचे सहकारी संतोष बोचरे यांनी तातडीने उपचार करून गाईचे प्राण वाचवले. या कार्यात नागेश परमाळे, दीपक इंगळे, विशाल पांडव, मुन्ना आंबेकर, राम फिसके, विजय भंडारे, कृष्णा शेळके, आदित्य नवघरे, सागर ताठे, तसेच पत्रकार देविदास खनपटे, गणेश लहाने, आवेज पठाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या जल्लोषात कोणीही मदतीसाठी पुढे येत नसताना, या युवकांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कृत्याने डोणगाव गावातच नव्हे तर संपूर्ण समाजात सकारात्मक संदेश दिला आहे.