बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात पाऊस पाहिजे तसा बरसला नाहीय परंतु 435521 हेक्टर पेरणी क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात 229494 भागांमध्ये केवळ 31 टक्के पेरण्या झाल्याचा कृषी विभागाचा आकडा आहे.मान्सूनचा जून महिन्यात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस झाला आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली.त्यामुळे कष्टाचं बियाणं मातीत पेरल्यानंतर ‘समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणे.. मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे’.. अशी आबेद शेख यांची काव्यओळ आठवण्याची वेळ शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांवर आली आहे.
शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागली असून कृषी क्षेत्राची चिंता वाढली आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यात 1 जूनपासून सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेमध्ये 16.59 टक्के पर्जन्यमान झाले आहे. माहे जूनच्या सरासरीचे पर्जन्यमान 92.65 टक्के आहे.दक्षिणेकडील काही राज्ये वगळता जवळपास सर्वच प्रदेशांमध्ये पाऊस कमी झाला असून, अर्ध्या देशात अजून मॉन्सून पोचलेला नाही. तसेच तो म्हणावा तसा बरसलेला नाही. उत्तरेकडील राज्यांमध्ये तर उष्णतेच्या लाटा जाणवत आहेत. सध्या मान्सूनची प्रगती ठप्प झालेली आहे. तो कमकुवत झाला असून, त्यामध्ये ऊर्जा येण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सामान्यता, 1 जूनच्या आसपास पाऊस दक्षिणेकडे सुरू होतो आणि 8 जुलैपर्यंत देशभर पसरतो. त्यामुळे कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांच्या लागवडीला आधार मिळतो, पण सध्या खूप कमी पाऊस झाल्याने पेरण्या 31 टक्के झालेल्या आहेत. परिणामी बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे.