चिखली (हॅलो बुलढाणा) चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रचाराला वेग आला असून प्रत्येक दिवशी घडणाऱ्या नवनवीन घडामोडींवरून महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या कडील वाढत्या लोकसमुहाचा ओघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशातच आज दि. ९ नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे खंबीर नेतृत्व रिपाइं आठवले गटाचे नेते नरहरी गवई यांनी आपल्या बहूसंख्य सदस्यांसमवेत महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
नरहरी गवई हे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राजकीय वर्तुळात बहुचर्चित व्यक्तीमत्व असून त्यांच्या जाहीर पाठिंब्याने राहूल बोंद्रे यांचा विजयाच्या दिशेने चाललेल्या प्रचारास योग्य दिशा मिळाली आहे. संविधान बचाओ चा नारा बुलंद करीत नरहरी गवई यांनी राहूल बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून आपणास महायुतीच्या कार्यकालात कशा प्रकारे वागणूक दिली गेली या बाबतीत ही त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि प्रचंड अराजकतेच्या काळात महायुतीच्या धोरणांना कंटाळून नरहरी गवई यांनी महायुतीची साथ सोडली. विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभागणी होऊ नये म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. मोठमोठे प्रलोभने झिडकारून नरहरी गवई यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहूल बोंद्रे यांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. ही घटना अत्यंत महत्त्वाची असून जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणता येईल.
ही जिल्ह्याच्या राजकारणातील खूप मोठी उलथापालथ आहे. नरहरी गवई यांनी दिलेला पाठिंबा हा महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल बोंद्रे यांना विजयासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार, एवढे मात्र खरे!












