बुलढाणा (हॅलो बुलडाणा) येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी जालिंदर बुधवत यांच्याबद्दल एक खास किस्सा सांगितला. उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या भावना आणि दिलेला शब्द हे बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण होते.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, “गद्दारांनी शिवसेना सोडून गेल्यानंतर, बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेची धुरा जालिंदर बुधवत आणि नरुभाऊ खेडेकर यांनी सांभाळली. त्यावेळी बुधवत यांना विधानसभेसाठी तयारी करण्याचे सांगितले होते, मात्र जयश्रीताईंना उमेदवारी देणे गरजेचे बनले. तेव्हा बुधवत यांनी ‘साहेब, तुमचा आदेश’ म्हणत कुठलेही आर्ग्युमेंट न करता मागे थांबण्याचा निर्णय घेतला. अशा निष्ठावंताला आता विधान परिषदेच्या आमदारपदाची संधी दिली जाईल.”
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत हजारोंच्या साक्षीने जालिंदर बुधवत यांना आश्वासन दिले की, “बुलढाण्यातून पुढचा एमएलसी. हा जालिंदर बुधवतच असणार आहे.” त्यांच्या या विधानावर प्रचंड टाळ्यांचा गडगडाट झाला. उद्धव ठाकरेंनी जयश्री शेळके आणि जालिंदर बुधवत या दोन भावी आमदारांसाठी हे जनतेचे समर्थन मागितले.
अशा प्रकारे उद्धव ठाकरेंच्या या भाषणाने बुलढाण्यात शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, तर जालिंदर बुधवत यांना त्यांच्या निष्ठेचा मान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.