बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी प्रचंड लोकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील टिळक नाट्यगृहाच्या मैदानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे.काही नेत्यांची भाषणे झाली असून अजून तोफ धडाडणे बाकी आहे.
शांतप्रिय बुलढाणा शहरातील वाढलेली गुंडशाही समूळ नष्ट करण्यासाठी जयश्रीताई शेळके यांना विजयी करावे असे आवाहन शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख छगन मेहत्रे यांनी केले. मेहेत्रे यांनी विद्यमान आमदारांच्या कार्यकाळात गुंडगिरी वाढल्याचा आरोप केला. प्राध्यापक नरेंद्र खेडेकर म्हणाले की, जयश्रीताईंच्या नावातच जय आहे.त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होणार असल्याचा आत्मविश्वास खेडेकर यांनी व्यक्त करून विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या नावातही जय असल्याचे सांगून तो जय दुसरा तिसरा असल्याचे ते म्हणाले.शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले की,जयश्रीताई साठी ही गर्दी प्रचंड स्वरूपात जमली आहे. नागरिक व महिलांना ओढून आणलेली ही गर्दी नाही विशिष्ट साड्या घालून महिलांची गर्दी केलेली नाही तर त्यांच्यात जयश्रीताई बद्दल नितांत आदर आणि उत्साह आहे त्यामुळे जयश्रीताईंचा निश्चित जय होणार असल्याचा त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.