देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव ) प्रतितिरूपती व जागृत देवस्थान असलेल्या व ३३२ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री बालाजी महाराजांचा लळितोत्सव हजारो भाविकांच्या साक्षीने दि.२१ ऑक्टोबर रोजी सूर्योदयी ५:४५ वाजता संपन्न झाला.
श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर विजयादशमीच्या पूर्वसंध्येला २१ महाकाय लाकडी लाटा व ४२ मंडप दोराच्या सहाय्याने उभारून मंडपोत्सव साजरा करण्यात आला होता. हा मंडपोत्सव सतत दहा दिवस सुरू होता. लाटा व मंडपाखालून जाण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भारतात इतर कुठेही नसलेला लळिताचा अनुपम सोहळा पाहण्यासाठी पूर्वसंध्येलाच भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
सकाळी काकड आरती झाली. मंदिरावर दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी ब्रम्हवृंदांच्या वतीने शांतीपाठ करण्यात आला व काल्याचे कीर्तन झाले. श्री बालाजी महाराजांची आरती सुरू झाल्यानंतर तसेच दहिहंडी फुटल्यानंतर एकाच वेळी सर्व २१ लाटा मंदिराच्या दिशेने कलंडल्या. भक्तांनी टाळ्यांच्या गजरात व श्रीं च्या जयघोषात या उत्सवाचा आनंद घेतला. त्यानंतर श्रींच्या मूर्तीला विधीवत गाभा-यात बसविण्यात आले.
लळितोत्सवानंतर श्री बालाजी संस्थानच्या वतीने भक्तांसाठी लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. लाडू प्रसाद बनवणे व वितरण करणे यासाठी मारवाडी समाजाने परिश्रम घेतले. तसेच ज्या भाविक भक्तांना जास्तीचा प्रसाद हवा होता, त्यांना १० रू. प्रति लाडू याप्रमाणे प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला. त्याला भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
लळितोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पूर्वसंध्येलाच शहरात दाखल झालेल्या भाविकांसाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, मित्र मंडळांच्यावतीने चहा, नास्ता व इतर सेवांची व्यवस्था करण्यात आली.
लळितोत्सव शांततामय वातावरणात पार पडावा यासाठी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बीडकर व संस्थानचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, सर्व मानकरी, सेवेकरी व नागरिकांनी परिश्रम घेतले.
विशेष बाब म्हणजे मागील वर्षीपासून सुरु झालेल्या उपक्रमानुसार, परिसरातील स्वयंसेविका महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अन्नछत्र सेवा, मंदिर परिसराची स्वच्छता, भाविकांच्या दर्शन रांगा नियंत्रण तसेच लाडू प्रसाद वितरण, इत्यादी सेवा संपूर्ण आठवडा देऊन सेवावृत्तीचा आदर्श निर्माण केला.