बिबि (हॅलो बुलढाणा /भागवत आटोळे) स्व.बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर चोरींचे प्रमाण वाढले आहे. डिझेल चोरीनंतर आता उभ्या ट्रेलरची स्टेफनी देखील चोरून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाणेदार संदीप पाटील यांनी या स्टेफनी चोराला बेड्या ठोकल्या असून गुन्ह्यात वापरलेली ३ लाखांची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार,आरोपी कृष्णा कौतीकराव भांबळे वय १८ रा. डौलखेडा ता.जाफ्राबाद जिल्हा जालना याने जितेंद्र रामअजारे प्रजापती वय २८ वर्ष रा बदीहारी पो. कोल्हयी ता जि महाराजगंज उत्तरप्रदेश यांच्या उभ्या असलेल्या ट्रेलर मधून जेके कंपनीची स्टेफनी चोरली. समृध्दी महामार्गावर चॅनल क्रमांक ३११ वर ही घटना घडली.
जितेंद्र प्रजापती रात्री आराम करीत असताना आरोपी कृष्णा भांबळेने ट्रेलरची ३० हजार रुपये किंमतीची स्टेफनी लंपास केली. याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने याचा तपास सुरू होता. दरम्यान २८ सप्टेंबरला आरोपीला राहत्या गावाहून अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली ३ लाख रुपये किंमतीची स्विप्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे. सदर कार्यवाही विश्व पानसरे पोलीस अधिक्षक बुलढाणा, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात खमगाव, अपर पोलीस अधिक्षक बि. बि. महामुणी, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदिप पाटील, पोनि स्थागुशा अशोक लांडे यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे बिबीचे ठाणेदार सपोनि संदिप पाटील सफी परमेश्वर शिदे, अशोक अंभोरे अरुण सानप, रविंद्र बोरे, जुबेर प्यारीवाले यांनी केली आहे.