चिखली (हॅलो बुलढाणा) एखादा पक्ष, संघाटना ही नेतृत्वाबरोबरच सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानातूनच यशस्वी झालेली असते. चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आतापर्यंतच्या वाटचालीत निष्ठावंत भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच राष्ट्रीय स्वंयसेवक संघानी घेतलेली मेहनत सर्वश्रुत आहे. मात्र आता मतदारसंघात भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना विचारात न घेता पक्षासंदर्भात होत असलेले परस्पर निर्णय, आयाराम- गयारामांचे होत असलेले पक्षप्रवेश, भाजपच्या जुन्या निष्ठावंताकडे होत असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष, विकासकामाच्या नावाखाली होत असलेला भ्रष्टाचार यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. आ. श्वेता महाले विरोंधात भाजपाच्या पदाधिकारी व स्वंयसवेकामध्ये प्रचंड नाराजीचा सूर असून याविरोधात निष्ठावंताकडून भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बचाव मोहिमेस प्रारंभ केल्याचे जेष्ठ भाजपा कार्यकर्ते बलदेवसिंग सपकाळ यांनी सांगितले.
बलदेवसिंग जुलालसिंग सपकाळ यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, चिखली विधानसभा मतदारसंघात भाजप वाढविण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करुन पक्षाची विचारसरणी ध्येय – धोरणे ही सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. मात्र आता प्रामणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीच आ. श्वेता महाले यांच्याकडून उपेक्षा होत असल्याने जेष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरुन आलेल्यांवर आ. श्वेता महाले विश्वास दाखवून मूळ कार्यकर्त्यांना डावलत आहे. जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची निष्ठा धूळीस मिळवून महायुतीची सत्ता असतांनाही हेतुपुरस्कर त्यांची कामे डावलली जात आहे. आ. महाले यांचा राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद खुंटला असून कुठल्याही प्रकारचा समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. विकासकामे करत असतांना मोठ्या प्रमाणात कमिशन तसेच भ्रष्टाचार होत असल्याच्या चर्चा जोर धरत असल्याने चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर एका जाहीर कार्यक्रमात आ. श्वेता महाले यांनी सांगितले होते की, मी भाजपाच्या ताकदीवर निवडून आली नाही, यातूनच त्यांची अहंकारी मानसिकता अन् भाजपच्या पदाधिकाऱ्यांची त्या सातत्याने करत असलेली अवहेलना स्पष्ट होते, असे सपकाळ यांनी सांगितले. तसेच लवकरच पत्रकारपरिषद घेवून सविस्तर भूमिका मांडून पुढील वाटचाल विशदं करणार असल्याचेही ते म्हणाले.
पक्षाच्या निष्ठावंताकडून भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बचाव मोहिमेस प्रारंभ झाला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील जेष्ठ भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेवून आ. श्वेता महाले यांचे मूळ कार्यकर्त्यांना संपावण्याचे षडयंत्र हाणून पाडावे, असे आवाहन निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते बलदेवसिंग सपकाळ यांनी केले आहे.
७ हजार भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
चिखली विधानसभा मतदारसंघातील १२० गावांमधून भाजपच्या ७ हजार मूळ कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष नाव नोंदणी करुन आपली खदखद व्यक्त केली आहे. तर उर्वरित गावांमधून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या पुढाकारातूनच भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता बचाव मोहिमेस प्रारंभ केला असल्याचे बलदेवसिंग सपकाळ म्हणाले आहे. अनेकजण भेटून तर काही भ्रमणध्वनीद्वारे आपला असंतोष व्यक्त करत असल्याने जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या न्याय हक्कासाठी कार्यकर्ता बचाव मोहिम यशस्वी करणार असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.