बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे 19 सप्टेंबरला जिल्हा दौऱ्यावर असून बुलढाणा शहरात दाखल होणार आहेत.या दौऱ्या दरम्यान सरकारच्या कुचकामी व नकारात्मक धोरणाविरोधात सरकारला काळी झेंडे दाखवून भीम आर्मी जाहीर निषेध करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी ‘हॅलो बुलढाणा’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने हेतू पुरस्सर षडयंत्र करून सामाजिक न्याय विभागाचा निधी कमी केलाय व तो इतरत्र वळवला आहे. सामाजिक न्याय खाते हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. अडीच वर्षापासून अनेक विद्यार्थी पात्र असताना देखील शिष्यवृत्ती पासून वंचित आहेत. स्वाधार योजना देखील नीट कार्यान्वित नाही. शासकीय वस्तीगृहामध्ये सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. दादासाहेब गायकवाड योजना पूर्णपणे मातीत घातली.तर जात पडताळणी विभाग तर भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. दलित वस्ती सुधार योजना केवळ कागदोपत्री जिवंत आहे. आणि हेतू पुरस्सर या विभागांमध्ये खलनायकी व भ्रष्ट स्वभावाचे अधिकारी बसवले आहेत. या विभागांतर्गत येणाऱ्या अनेक मंडळांना अध्यक्ष सुद्धा नाहीत. जवळपास सर्वच मंडळं ही ठणठण गोपाळ झालेली आहेत.गरीब व गरजू विद्यार्थ्यांची केवळ हेळसांड करण्यासाठी या इमारती उभ्या केल्या की काय असा प्रश्न यातून निर्माण होतो.या सर्व षडयंत्र मागे हळूहळू हा विभाग बंद पाडण्याचा डाव हा राज्य सरकारचा असावा अशी देखील चर्चा आहे. ही बाब आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जाती समूहासाठी अतिशय घातक असल्याचे सतिश पवार म्हणाले. त्यामुळे यासाठी वेळीच आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे. या आंदोलनाच्या श्रुंखलेचा पहिला टप्पा म्हणून येत्या 19 सप्टेंबरला बुलढाणा येथील मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यादरम्यान सरकारच्या कुचकामी व नकारात्मक धोरणा विरोधात सरकारला काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध केल्या जाणार आहे.नागरिक व कार्यकर्त्यांनी देखील येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या आंदोलनामध्ये मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे
असे आवाहन सुद्धा पवार यांनी केले आहे.
▪️..तर महाराष्ट्रभर व्यापक आंदोलने!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यापूर्वी देखील बुलढाणा मध्येच ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या एक लाख स्वाक्षरींचे निवेदन देण्यात आलेले होते परंतु एवढ्या मोठ्या व महत्त्वाच्या निवेदनाला देखील मुख्यमंत्री महोदयांनी केराची टोपलीच दाखवली. त्यामुळे त्यांच्या या धोरणाचा निषेध करणे नाईलाज होत आहे. यापुढे देखील मुख्यमंत्री महोदयांनी याबाबतीत सकारात्मक निर्णय न घेतल्यास व विद्यार्थ्यांचे भविष्य असेच अंधकारमय झाल्यास पूर्ण महाराष्ट्रभर भीम आर्मीच्या वतीने व्यापक स्वरूपाची आंदोलने संविधानिक मार्गाने छेडण्यात येतील,असा इशाराही भीम आर्मीच्या वतीने देण्यात आला आहे.