बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या पार्श्वभूमीवर समाजसेवी प्रभाकर वाघमारे यांनी आपले मत स्पष्ट केले. मरणानंतर सांत्वन भेटी घेण्या पेक्षा जीवन जगत असताना तणावग्रस्तांच्या भेटी वाढवा, आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकतात,असे ते म्हणाले.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.जगभरातील विविध उपक्रमांद्वारे आत्महत्या रोखण्यासाठी यादिवशी संदेश देण्यात येतो. 2003 पासून या दिवसाची सुरवात झाली. हा वार्षिक जागरूकता दिवस इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन (IASP) द्वारे आयोजित केला जातो. IASP च्या मते प्रत्येक आत्महत्या विनाशकारी असते आणि त्याचा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर खोलवर परिणाम होतो. परंतु जागरूकता वाढवून, आपल्या सभोवतालच्या लोकांशी बोलून, आपण जगभरातील आत्महत्येच्या घटना कमी करू शकतो. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा आत्महत्येबद्दल जागरुकता निर्माण करण्याची आणि ती रोखण्यासाठी प्रयत्नांना चालना देण्याची संधी आहे.त्यामुळे प्रभाकर वाघमारे म्हणाले की,बुलढाणा जिल्ह्यात आत्महत्यांची संख्या वाढत आहे.70 टक्के आत्महत्या ह्या आर्थिक तणावातून होत असल्याचे वास्तव आहे.अवैध सावकारी वाढली असून गोरगरीब व शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.त्यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होऊन ते आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. अलीकडे शेतकरी,शिक्षक,पोलीस, कर्मचारी देखील आत्महत्या करू लागले आहेत.त्यामुळे ह्या आत्महत्या रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज असून देवधर्मात दान केल्यापेक्षा गरजूंना आधार देणे, गरजूंच्या समस्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे.मेल्यानंतर सांत्वन भेटी घेतल्यापेक्षा तणावग्रस्तांच्या भेटी घेऊन सुंदर आयुष्य जगण्यासाठी त्यांच्यात आत्महत्याबद्दल जागरूकता निर्माण करा आणि आत्महत्या रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही वाघमारे यांनी बोलताना सांगितले.