spot_img
spot_img

खड्डेमय रस्त्याच्या समस्येतून बुलढाणेकरांना सोडविणार कोण? -प्रशासकीय यंत्रणा निर्ढावली! -त्रिशरण चौक ते खामगाव फाट्या पर्यंतचा रस्ता भोगतोय नरक यातना!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पावसाळा,खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले आहे.यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही. त्यामुळे त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतचा खड्डेमय डांबरी रस्ता मरणयातना भोगत असून, रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व नागरिक बेहाल दिसताहेत.परिणामी निर्ढावलेल्या प्रशासकीय यंत्रणेविरुद्ध अनेक जण आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

शहरातील त्रिशरण चौकापासून ते खामगाव फाट्यापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते तर खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. रस्ता धोकादायक बनल्याने विद्यार्थी, रुग्णांचे हाल होताहेत.
गेली अनेक वर्षे पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था होते; मात्र प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पुन्हा मात्र परिस्थिती जैसे थे च असते.खामगाव रोडवर असलेल्या एका शाळेपुढे झाला मोठा खोल खड्डा पडला असून त्यात पाणी तुंबले आहे.येथे वारंवार अपघाताच्या घटना घडतात.केवळ राजकीय मंत्री आले की रस्त्याची थातुरमातुर मलमपट्टी केली जाते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हा रस्त्याचा प्रचंड उल्लेख त्या ठिकाणी झाला होतामात्र सद्यस्थितीत या रस्त्याची हाल न पाहिलेलेच बरे! या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी तुंबल्याने डासोत्पतीचे स्थान होवून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.त्रिशरण चौक ते वरवंड फाट्यापर्यंत रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.काही राजकारणी लोकांनी या रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केले होते, मात्र आंदोलनाला यश आले नाही.हे आंदोलन केवळ प्रसिद्ध मिळविण्यासाठी होते का?असाही प्रश्न विचारला जात आहे.शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण केले होते मात्र पुढे काय झाले हे कळले नाही.त्यामुळे या खड्डेमय रस्त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनतेकडून होत आहे; मात्र प्रशासनाकडून मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!