बुलढाणा (हॅलो बुलढाणा)
निरागस चिमुकली होतात गोळा,
निरामयपणे भरतो तान्हा पोळा..
लाकडाचे न् कुठे मातीचे नंदीबैल,
तानुल्या बाळांचा हा मोठा सोहळा !
तान्हा पोळा, ही विदर्भाची खास ओळख. लहान मुलांना बैलांचं महत्त्व समजावं म्हणून, नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी या उत्सवाला सुरूवात केली. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा ‘तान्हा पोळा’ भरवला जातो, तर वऱ्हाडात साधारणत: मातीचे बैल हाती घेऊन मुलं घरोघरी तान्हा पोळा मागत फिरतात. १८०६ मध्ये ‘तान्हा पोळा’ उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. कृषक संस्कृती लहानपणीच मुलांमध्ये रुजावी, त्यासाठीचा हा उत्सव !
_तान्हा पोळा, आम्ही मागायचो. तो काळ खडकू, दोन पैसे, पाच पैसे, दहा पैसे, वीस पैसे, चाराने, आठाने, बाराणे ते एक रुपया.. असा. गावभर बैलं हाती घेत फिरून एखादा रुपया जरी जमा झालातरी आनंद गगनात मावत नव्हता. काही मित्र जमून आम्ही सायंकाळी लाकडी बैल व मातीच्या बैलांचा खोटा-खोटा पोळा फोडायचो._
लग्न झालं, नंतर मुलं झाली.. बुलढाण्यासारख्या शहरात राहत असलोतरी त्यांना मातीची बैल हाती घेऊन तान्हा पोळा मागायला लावायचो. २०१५ हे दुष्काळी वर्ष, पाऊस फारसा पडला नव्हता.. त्याचवर्षी पोळ्याच्या दिवशी दोन शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यात आत्महत्या केल्या होत्या. त्यावर्षी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी “नाम”ची चळवळ सुरू केली होती, ते एवढं मोठ्या प्रमाणावर करतात तर आपण छोट्या प्रमाणावर काही करू का नये ? म्हणून मी माझ्या लहान मुलांना तान्हा पोळा मागायला लावला. आधी जवळचे ५-५ हजार रुपये दोघांच्या बॉक्समध्ये टाकले, नंतर दोघांनी मिळून १२ हजार २२२ रुपये, असे एकूण २२,२२२ रुपये त्या बॉक्समध्ये जमले. विशेष म्हणजे त्याचवर्षी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे “नाम”साठी बुलढाण्यात आले असता, त्यांनी या लहान मुलांचे कौतुक केले होते. त्यानंतर “सेवासंकल्प”च्या कार्यक्रमात उज्जैन येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीरभाई गोयल आले असता, त्यांच्याहस्ते पोळ्याच्या दिवशी ज्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.. त्यांच्या कुटुंबीयांना त्या तान्हा पोळा निधीत जमा झालेल्या प्रत्येकी १०-१० हजार रुपये व सेवा संकल्पच्या रुग्णवाहिकेसाठी २२२२ रुपये देण्यात आले होते.
_तान्ही मुलं आता मोठी झालीत, एका मुलीचे तर लग्नही झालं.. एक मुलगी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी तर मुलगा सीए.च्या कोर्ससाठी शिकायला गेले आहे. मुलं कितीही मोठी झालीतरी, आई-वडिलांसाठी ती लहानच असतात. आज तान्हा पोळा.. तान्ही बाळं मोठी झाल्यावर शिक्षणासाठी भुर्र उडून जातात तेंव्हा, आपलंच मन तान्हं होऊन जातं !_
अन् सहज आठवायला लागतं एक गाणं..
_ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो.._
_भले छीन लो, मुझसे मेरी जवानी.._
_मगर मुझको लौटा दो, बचपन का सावन.._
_वह कागज़ की कश्ती, वो बारिश का पानी !!_