बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना, सत्ताधारी व विरोधकांमध्ये चिखलफेक सुरू झाली. एकमेकांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ लागला.दरम्यान माँ जिजाऊंच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात पारदर्शी विकास कामे करण्याकरिता महिला उमेदवारांना संधी देण्याचा सूर आवळल्या जात आहे.निवडणुकची लढाई लढण्यासाठी रणरागिनी सज्ज देखील झाल्यात. पक्षश्रेष्ठींनी महिलांना विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी,अशी गळ घातल्या जात असून महायुती, महाविकास आघाडी,राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षातून महिलांना उमेदवारी मिळेल का? असा प्रश्न महिला वर्गातून उपस्थित होतोय.
राज्यघटना भारताने स्वीकारल्यापासून झालेल्या निवडणुकीत लोकसभेतही महिला उमेदवाराला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही.विधानसभेसाठी चिखली मतदार संघात श्वेता महाले यांना उमेदवारी मिळाली.जिल्ह्यात महिला आमदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच नगराध्यक्ष झाल्यात. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे.विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेक महिला
इच्छुक आहेत. प्रेमलाता सोनोने यांनी तर शिवसेना पक्षश्रेष्ठीला मोताळा – बुलढाणा विधानसभा मतदारसंघ महिलांसाठी राखीव करण्याची मागणी केली.काँग्रेसच्या प्रदेश सचिव ॲड. जयश्रीताई शेळके यांचाही गुप्तपणे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.शिवाय चिखलीतून विद्यमान आमदार श्वेता महाले,ज्योती ताई खेडेकर,रेखाताई खेडेकर व जळगाव जामोद मधून वंदना डिक्कर,सिंदखेडराजा येथून गायत्रीताई शिंगणे यांचीही तिकीट मिळविण्यासाठी जोरदार धडपड चालली आहे.
माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी विधानसभेत प्रथमच राष्ट्रमाता जिजाऊ यांची तैलचित्र विधानसभा लावण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला होता.त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना मिळाली नाही.ते आता विधानसभेसाठी इच्छुक आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांची दिशा महिला बचत गट फेडरेशनद्वारे महिलांना रोजगार व आर्थिक सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे. पक्षाच्या माध्यमातूनही त्यांचं कार्य मोठं आहे.त्यांनाही विधानसभा निवडणुकीची तिकीट अपेक्षित आहे.प्रेमलता सोनोने यांनी अस्तित्व संघटनेच्या माध्यमातून मुंडन आंदोलन, बॉटल बैठे आंदोलन सारखी अनेक आंदोलनं करून दबदबा निर्माण केला.एकीकडे पुरुष आमदार सध्या एकमेकावर आरोप करून एकमेकांची पोलखोल करताना दिसत आहेत. त्यामुळे मतदार राजकारणाला वैतागलेले दिसून येत आहेत. परिणामी महिलांच्या हाती विधानसभा उमेदवारी देवून मतदार संघाच्या नेतृत्वाची दोरी दिल्यास मतदारसंघाचा उद्धार होण्याची अपेक्षा उंचावत आहे.