बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढतोय. तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. येळगाव येथे असे चित्र पाहायला मिळेल.
ग्रामपंचायतने सुरू असलेल्या अवैध धंद्या बाबत आज 30 ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय,असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करताहेत. अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच येळगावात विनापरवानगी दारूचा व्यवसाय गृह उद्योग तर वरली मटका उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे.अनेकांनी मटक्याला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. बस थांब्यावर हा वरली मटका सुरू असल्यामुळे गावातील लोक कर्जबाजारी होत असून,प्रसंगी आत्महत्या करण्यास मजबूर होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.सर्रासपणे अवैध दारू विक्री होत असल्याने तरुणाई व्यसनाधीन होत आहे.त्यामुळे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन येळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.धंदे बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.










