बुलढाणा (हॅलो बुलडाणा /राजेंद्र घोराडे) भक्तिमार्ग या गोंडस नावाखाली ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी सरकारने आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा जो कुटील डाव रचलेला आहे तो कदापिही यशस्वी होऊ देणार नाही.भक्ती मार्ग रद्द करण्यासाठी आवश्यक असेल तर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावरील व कायदेशीर आणि न्यायालय लढाईसाठीही मी तयार असेल.असे माजी जी.प.सदस्य तसेच राष्ट्रवादी श.प. गट पश्चिम विदर्भ महिला आघाडीच्या विभागीय प्रमुख डॉ. ज्योती खेडेकर यांनी हॅलो बुलढाणाशी बोलताना सांगितले.भक्तिमार्ग रद्द करण्यासाठी पेठ येथे काही शेतकऱ्यांसोबत सौ. ज्योतीताई खेडेकर यांनी जलसमाधी आंदोलनामध्ये भाग घेतला होता त्या अनुषंगाने विचारणा केली असता डॉ. खेडेकर बोलत होत्या.
पुणे मुंबईतील हौशा गौश्यांना शेगावला जाण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ वाचावा,म्हणून माझ्या जिल्ह्यातील पाच हजार एकर पेक्षा जास्त जमीन आणि 5000 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा चुराडा करून हा ‘भक्ति’ महामार्ग बनवण्यात येणार आहे. मुळातच अल्पभूधारक झालेला माझा शेतकरी राजा याला भूमीहीन करण्याचा सरकारचा हा कुटील डाव आहे. शेती विकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे व वेगवेगळ्या लालूच दाखविल्या जात आहे. पण “शेत विकून सुखी झालेला एक तरी शेतकरी आम्हाला दाखवून द्या”.मुळात विकासाच्या नावावर “भकास” निर्माण करून पुढील निवडणुकीसाठी पैसा गोळा करण्याची सरकारची ही “रोजगार हमी योजना” आहे. आणि शेतकऱ्यांना सरकारची ही चाल लक्षात आलेली आहे,त्यामुळे प्रचंड प्रमाणात या भक्ती मार्गाला विरोध होत आहे.
जिल्ह्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता परस्पर अधिसूचना काढून हा महामार्ग बनवण्याचा सरकारचा जो प्रयत्न चालला आहे त्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत मी सदैव उभी असेल.असे प्रतिपादन सौ ज्योती शिवशंकर खेडेकर यांनी केले.
▪️सरकारचे पोपट..
मुळात लोकांचे प्रतिनिधी असलेल्या आमदारांनीच सरकारवर दबाव टाकून शेतकऱ्यांचे अहित करणारा हा मार्ग रद्द करायला बाध्य करायला हवे होते, परंतु या सरकारचे पोपट असलेल्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रेतावरील टाळूवरचे लोणी खायचे ठरवलेले असेल, तर त्यांना या सरकारच्या धोरणामध्ये काहीच चुक दिसणार नाही.परिस्थिती काहीही असली आणि लोकप्रतिनिधी कितीही बेजबाबदारपणे वागले तरी भक्ती मार्ग रद्द होईपर्यंत मी शेतकऱ्यांच्या सदैव सोबत राहील,असे प्रतिपादन सौ ज्योती खेडेकर यांनी केले.