बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला आणि नव्या वादाला सुरुवात झाली.पण विरोधकांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी रेटून धरली तरी ‘खाकी’वर ‘खादी’चा भार असल्याचे चित्र दिसून येत आहे.याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली असता अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.
लोकप्रतिनिधींच्या मुलांचा वाढदिवस खास असतो? ते काही पण करू शकतात काय?आमदार आपल्या मुलाच्या वाढदिवसाला अगदी तलवारीने केक कापून सर्वसामान्य समोर कुटुंब व इष्ट मित्रांना तलवारीनेच भरवू शकतात काय?त्यांच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होत नाही का?यापूर्वी तर इतरांवर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत.
मग आमदारांवर का होऊ शकत नाही?कायदा फक्त सामान्यांसाठी आहे का? मग लोकप्रतिनिधींचा काय?
असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.या संदर्भात काँग्रेस नेते जयश्री शेळके यांनी फेसबुक पोस्ट करून खळबळ उडून दिली.याची चर्चा राज्यभरात सुरू असली तरी अजूनही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.त्यामुळे खाकी वर खादी भारी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मग त्यांची कृती असो की वक्तव्य असो, वाद हा होणारच! त्यामुळे संजय गायकवाड आणि वाद हे जणू समिकरण बनले आहे. आता आमदार संजय गायकवाड यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. त्याला निमित्त ठरलं आहे ते त्यांच्या लेकाचा मृत्युंजय चा वाढदिवस. त्यांनी त्याच्या वाढदिवसाला आणलेला केक हा तलवारीने कापला. बरं ते त्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तो केकही लेकाला तलवारीनेच भरवला. त्याने त्यांचे मन भरले नाही. तर आपल्या पत्नीलाही त्यांनी तलवारीनेच केक भरवला.दरम्यान मुलाच्या वाढदिवसानिमित्त आ. संजय गायकवाड यांनी भरचौकात तलवारीने केक कापून तो तलवारीनेच भरवला, आर्म ऍक्ट नुसार हा गुन्हा आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधींवर आहे.त्यांच्याकडूनच जर हे कृत्य घडत असेल तर पोलीस प्रशासन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का?कायदा सर्वांसाठी सारखा आहे. आर्म्स ऍक्ट नुसार जर सामान्यांवर या प्रकरणात गुन्हे दाखल होत असतील तर आमदारावरही झाला पाहिजे! अशी जयश्री शेळके यांची फेसबुक पोस्ट राज्यभर खळबळ उडवून देत आहे.