मेहकर (हॅलो बुलढाणा / सुभाष नरवाडे ) सरकारने सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे. मात्र बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरा देवीचा या योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यात बहुसंख्य असलेल्या बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या असून समाजात असंतोषाची भावना आहे,त्यामुळे देशातील सर्व बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेले संत श्री सेवालाल महाराज यांच्या समाधी स्थळ असलेल्या पोहरागड चा समावेश सदर योजनेत करावा अशी मागणी सकल बंजारा समाजामार्फत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.प्रशांत राठोड यांनी सरकार कडे केली आहे.
यासंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार असून समाजाला न्याय देण्याची मागणी करणार आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास समाजात असंतोषाचे वातावरण अजून तीव्र होऊ शकते.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जाती धर्मातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे . आर्थिक अडचणी व इतर मर्यादांमुळे तीर्थक्षेत्रांना भेट देण्याच्या आव्हानांचा सामना करणाऱ्या भक्तांना मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
यासंदर्भात आज मा.आ. संजय रायमूलकर यांच्यामार्फत सुद्धा मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,यांना सर्व बंजारा बांधवामार्फत निवेदन देण्यात आले.