चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) सायंकाळचे साडेपाच वाजले होते. चव्हाणवाडीजवळ रस्त्याच्या कडेला एक महिला रांगोळी काढत होती. त्याच वेळी चिखलीकडून जालन्याच्या दिशेने भरधाव आलेली पिकअप थेट दुभाजकावर आदळली आणि रस्त्यावर पलटी झाली. रांगोळी काढत असलेली महिला या अपघातातून थोडक्यात बचावली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली-जालना महामार्गावरून जाणारी पिकअप चव्हाणवाडीजवळ पोहोचली, तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वेगात असलेली गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. धडकेनंतर काही क्षणांतच पिकअप रस्त्यावर उलटली. या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली.
अपघात झाला, तेव्हा रांगोळी काढणारी महिला रस्त्याच्या कडेलाच होती. पिकअप कडेकडे सरकली असती, तर तिच्या जिवावर बेतण्याची शक्यता होती. सुदैवाने गाडी तिच्यापर्यंत पोहोचली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, पिकअप पलटी झाल्यानंतर गाडीतील चालक आणि हेल्पर दोघेही घटनास्थळावरून निघून गेल्याचे समजते. महामार्गावर नियंत्रण सुटलेल्या एका वाहनामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यक्तीचाही जीव कसा धोक्यात येऊ शकतो, हे चव्हाणवाडीजवळच्या या घटनेने दाखवून दिले.












Total Users : 3726697