spot_img
spot_img

झाडांवर फास… समुद्रात शेतकरी… विधानभवनासमोर सातबाऱ्यांचा वर्षाव; अखेर सरकार हादरले, तुपकरांसोबत CM बैठक ठरली!

मुंबई (हॅलो बुलढाणा) सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईत छेडलेला शेतकऱ्यांचा एल्गार अखेर सरकारला हादरवून गेला. विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांचा वर्षाव, सोयाबीन-कापसाची उधळण आणि त्यानंतर मंत्रालयासमोर जीवघेणा ठिय्या… या आक्रमक आंदोलनाच्या तडाख्याने सरकारला अखेर चर्चेच्या टेबलावर यावे लागले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः रविकांत तुपकर यांना फोन करून आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक निश्चित झाल्याचा निरोप दिला.

आज सकाळपासूनच विधानभवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेकडो शेतकरी तुपकरांच्या नेतृत्वात थेट विधानभवनाच्या दिशेने धडकले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदत आंदोलकांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप करत सातबाऱ्यांच्या प्रती भिरकावण्यात आल्या, तर सोयाबीन-कापूस उधळून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

यानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह शंभरावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. मात्र, या कारवाईनंतर आंदोलन शांत होण्याऐवजी आणखी भडकले. मंत्रालयासमोरील दोन उंच झाडांवर चार कार्यकर्ते चढले आणि गळ्यात फास अडकवून ठिय्या मांडला. बैठक जाहीर होईपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने प्रशासनाची अक्षरशः धावपळ उडाली. त्याचवेळी काही शेतकरी मरीन ड्राईव्हवर समुद्रात उतरल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्टवर गेली.

वाढत्या दबावानंतर अखेर सरकारकडून हालचाली सुरू झाल्या. गिरीश महाजन यांनी तुपकरांना फोन करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाल्याची माहिती दिली. त्यानंतर तुपकरांनी झाडावर चढलेल्या कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत, “तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे; लढणारी माणसं टिकली पाहिजेत,” असे आवाहन केले. तुपकरांच्या शब्दानंतर आंदोलक खाली उतरले.

जून महिन्यातील अन्नत्याग आंदोलनावेळी दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केली नाहीत, असा तुपकरांचा आरोप आहे. आता दुपारी ४ वाजताच्या बैठकीत सरकार ठोस निर्णय घेते की पुन्हा आश्वासनांचीच बोळवण करते, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!