बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आधीच तीव्र पाणीटंचाईने हैराण झालेल्या बुलढाणा शहरासाठी आणखी एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकपूर्णा धरणाच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्याने लाखो लिटर मौल्यवान पाणी अक्षरशः वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, मर्यादित वेळेतच पाणीपुरवठा होत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या झळा, घटती पाणीपातळी आणि शहरावर आलेले पाणीटंचाईचे सावट अशा परिस्थितीत ही गळती म्हणजे बुलढाणेकरांच्या सहनशीलतेची परीक्षा ठरत आहे.
खडकपूर्णा धरणावरून येणाऱ्या पाण्यावर शहरातील हजारो नागरिक अवलंबून आहेत. अशा वेळी मुख्य लाईनला गळती होऊन पाणी वाया जाणे ही केवळ तांत्रिक चूक नसून नियोजनशून्य कारभाराचे ठळक उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
संबंधित विभागाने तातडीने जागेवर पाहणी करून पाईपलाईनची दुरुस्ती करावी, गळती कायमची थांबवावी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा पाणीटंचाईचा उद्रेक प्रशासनाला महागात पडू शकतो.










