बुलढाणा (हॅलो बुलढाणा) प्रत्येक खेड्यापाड्यात वैद्यकीय सेवा अत्यावश्यक असते. परंतु ती सुसज्ज असायला हवी. म्हणूनच बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले आहे.शासनाने याबाबत आदेश काढला असून लवकरच हे ग्रामीण रुग्णालय साकारणार आहे.
बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु येथे पाहिजे तशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. ग्रामस्थांना बुलढाणा मुख्यालयातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी यावे लागत होते. परंतु रायपूर जिल्हा परिषद सर्कल मधील पदाधिकारी, समाजसेवी व ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न आमदार श्वेता महाले यांच्याकडे मांडला. दरम्यान त्यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे. आता प्राथमिक आरोग्य केंद्राची 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन केल्याचा आदेशच शासनाने काढला आहे. सदर श्रेणीवर्धित रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा अधिकृत करून बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान आमदार श्वेताताई महाले आणि विद्याधर महाले यांनी पाठपुरावा केल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.