बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कायद्याचे रक्षकच भक्षक बनले तर जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटवणारी धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली आहे. तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलिसांवर थेट अकोला पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनीच जीवघेणा हल्ला केल्याने संपूर्ण पोलीस विभाग हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे मध्यरात्री गस्त घालत असताना ‘गुप्तधन’ प्रकरणाची माहिती तपासून परत येत होते. यावेळी त्यांना दोन संशयित दिसले. साधी चौकशी करताच आरोपी राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे यांनी संतापाचा स्फोट केला. वाद वाढताच त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला.
हातातील स्टीलच्या कड्याने संतोष आखरे यांच्या पाठीवर आणि कपाळावर जबर वार करण्यात आले. या हल्ल्यात आखरे गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रमोद मुळे यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे, दोन्ही आरोपी हे अकोला पोलीस दलातीलच कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी तामगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास ठाणेदार पंडितराव सोनवणे करत आहेत. मात्र, ‘खाकी’वरच हल्ला करणाऱ्या या पोलिसांवर कठोर कारवाई होणार का? असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित होत आहे.
एकीकडे जनता सुरक्षिततेसाठी पोलिसांवर विश्वास ठेवते, तर दुसरीकडे अशा घटनांनी खाकीची प्रतिमा काळवंडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अकोला पोलीस प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.











