बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यातील राजकारण पुन्हा एकदा पेटले असून आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आदिवासी आश्रम शाळेतील मुलींबाबत केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दि. ८ एप्रिल रोजी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करत गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये कारवाई करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आणि खालच्या पातळीवरील आरोप केले. या आरोपांमध्ये आदिवासी आश्रम शाळेतील मुलींच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
भाजपच्या म्हणण्यानुसार, कोणताही पुरावा किंवा तक्रार नसताना अशा प्रकारचे वक्तव्य करून गायकवाड यांनी केवळ एका नेत्याची नाही, तर संपूर्ण आदिवासी समाजाची आणि मुलींच्या सन्मानाची पायमल्ली केली आहे. या प्रकरणामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन आदिवासी कुटुंबे आपल्या मुलींना शिक्षणासाठी पाठवण्यास घाबरतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गायकवाड यांच्यावर यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांवर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांचा पॅटर्नच वादग्रस्त असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.या प्रकरणामुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसांत हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.










