चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली तालुक्यातील केळवद परिसरात घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण तालुका हादरवला असतानाच, चिखली पोलीस यांनी अवघ्या काही तासांत सिनेस्टाईल पाठलाग करत दोन आरोपींना जेरबंद करत प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला केवळ मारहाणीचा गुन्हा वाटणाऱ्या या घटनेने आता खुनाचे भीषण रूप घेतले आहे.
यापूर्वी “हॅलो बुलढाणा”ने दिलेल्या बातमीनुसार, केळवदजवळील हॉटेल गुलमोहर परिसरात स्विफ्ट डिझायरमधून आलेल्या टोळक्याने गणेश भागवत गुडडा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. डोक्यावर काठीने प्रहार करत त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले.
तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की आरोपींनी गणेश यांना केवळ मारहाणच केली नाही, तर गाडीच्या दरवाज्यात अडकवून तब्बल 50 मीटर फरपटत नेले! या अमानुष कृत्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन विशेष पथके तयार करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. बोथाकाजी परिसरात संशयित स्विफ्ट डिझायर दिसताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला. आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र थरारक चेसनंतर त्यांना पकडण्यात यश आले.
अटक करण्यात आलेले आरोपी शेख शाहरुख शेख प्यारु (31) व सुप्रबुद्ध महादेव हिवराळे (33) रा. बोथाकाजी, ता. खामगाव असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.










