spot_img
spot_img

वांग्याच्या शेतात ‘अफू’चा धंदा! अंढेरा पोलिसांची धडक कारवाई; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वांग्याच्या शेतातच लपवून अफूची लागवड केल्याचा मोठा प्रकार समोर आला असून अंढेरा पोलिसांनी तब्बल ११.४७९ किलो अफूची झाडे जप्त करत ९.१८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या पथकाने अंढेरा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान ही माहिती मिळताच तात्काळ सापळा रचला. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्रीच पथकाने मेरा खुर्द येथील शेतावर छापा टाकला.

पहाटे साडेचारच्या सुमारास केलेल्या कारवाईत क्रुष्णा रामहरी वाघमारे (वय 26) हा आरोपी शेतातच आढळून आला. वांग्याच्या पिकामध्ये कुशलतेने लपवून ठेवलेली अफूची झाडे पाहून पोलिसही चकित झाले. पंच आणि राजपत्रित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण शेताची झडती घेण्यात आली असता अफूची बोंडे असलेली झाडे मोठ्या प्रमाणात आढळली.

फॉरेन्सिक तपासणीत ही झाडे अफूचीच असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने स्वतः कबुली देत सुमारे तीन महिन्यांपूर्वी आर्थिक फायद्यासाठी ही लागवड केल्याचे सांगितले.

यानंतर पोलिसांनी संपूर्ण झाडे उपटून त्याचे तीन बंडल तयार करत वजन केले असता एकूण ११.४७९ किलो माल जप्त करण्यात आला. सर्व मुद्देमाल जागीच सील करून जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतात अफू… आणि वरून वांग्याचा आडोसा! या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!