बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बातमीची हेडिंग वाचून थोडं भयावह वाटलं असलेच पण विषय असा आहे की…. तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी थेट झोपेत असलेल्या महिलेच्या नाकातील सोन्याची नथ ओढून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सौ. अनिता गोविंदा पवार (वय 55) या आपल्या पतीसह अंगणात झोपलेल्या असताना मध्यरात्री सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घरावर धाड टाकली. रात्री अंदाजे 1 वाजताच्या सुमारास चोरटे घराजवळ येऊन थेट महिलेच्या नाकातील सुमारे 5 ग्रॅमची, 35 हजार रुपये किंमतीची सोन्याची नथ हिसकावून पळाले.
यावरच न थांबता चोरट्यांनी घराचे दार उघडून आत प्रवेश करत लोखंडी पेटी फोडली आणि हरभरा विक्रीचे ठेवलेले तब्बल 78 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. एकूण 1 लाख 13 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
घटनेनंतर बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. या थरारक प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून आता घरातही सुरक्षितता नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.










